दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले स्वागत करीत आहे.

बँकेचा गेल्या १०७ वर्षांचा इतिहास

जळगांव जिल्ह्याच्या सर्व मराठी भाषिक, गरीब, गरजू जनतेचा सर्वांगिण विकास व समृध्दी होण्याच्या दृष्टीने व सर्वच स्तरावरील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी दि पूर्व खान्देश डिस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑपरेटीव्ह बँकेची स्थापना दि.१९ मे १९१६ रोजी जळगांव येथील नामांकित वकील व प्रमुख प्रर्वतक मा. दत्तात्रय गोविंद जुवेकर व इतर प्रतिष्ठीत समाज सेवक संचालक यांनी केली. दि.२७ मे १९१६ रोजी पूर्व खान्देश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोंदणी झाली व सरकार नियुक्त पहिले ९ सदस्यांचे संचालक मंडळ अस्तित्वात आले. बँकेचे पहिले चेअरमन म्हणून मा. दत्तात्रय गोविंद जुवेकर यांची नेमणुक करण्यात आली. बँकेचा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने संस्था सभासद म्हणून बोदवड सहकारी सोसायटीने पहिला शेअर दि.३१ जुलै १९१६ रोजी घेतला.

बँकेची स्थापना झाली त्यावेळेस सन १९१६-१७ मध्ये ३५ संस्था व ११२ व्यक्ती असे एकूण १४७ सभासद होते. वसुल भाग भांडवल रु.२६०००/- गोळा झालेले होते. सन १९५१ मध्ये ३२०२ सभासद, सन १९६६ मध्ये ४५०३ तर नोव्हेंबर २०१५ रोजी बँकेची एकूण सभासद संख्या ७५३४ असून त्यापैकी व्यक्ती सभासद संख्या २६२४ आहे. बँकेची पहिली शाखा सप्टेबर १९२३ मध्ये पाचोरा येथे सुरु करण्यात आली. व सन १९३५ पर्यंत मुख्य कार्यालयासह बँकेच्या ८ शाखा कार्यान्वीत झाल्या. सद्यस्थितीत जळगाव जिल्हाभरात बँकेच्या मुख्य कचेरीसह एकूण २३७ शाखा कार्यान्वित आहेत. बँकेने जून १९१९ मध्ये गर्व्हमेंट सर्व्हट को.ऑपरेटीव्ह सोसायटीचे इमारतीत रु.७५/- वार्षिक भाड्याने मुख्य कार्यालय सुरु केले. सन १९३२-३३ मध्ये बँकेने रु.४९२३३/- खर्च करुन स्वतःची मुख्य कार्यालयासाठी घडीव दगडाची इमारत बांधकाम केली. यामुळेच जिल्हा बँक स्थानिक बोलीभाषेत “दगडी बँक" म्हणून ओळखली जाते.

१०० वर्षापूर्वी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज बलाढ्य वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. आज बँकेच्या स्वतःच्या मालकीच्या ५० इमारती आहेत. सन १९९० मध्ये बँकेने रु.२ कोटी ३२ लाख खर्च करुन भव्य नाट्यगृहासहीत बँकेची प्रशासकीय इमारत बांधकाम केली होती. बँकेस भारतीय रिझर्व बँकेने दि.२८ मार्च २०१२ रोजी बँकींग व्यवसाय परवाना दिलेला आहे.



बँकेचे मुख्य कार्यालय,
सन १९१६

बँकेचे मुख्य कार्यालय,
सन १९६९

बँकेचे मुख्य कार्यालय,
सन १९९०

आर्थिक विहंगावलोकन:


  • ठेवी: १९१७-१८ मध्ये एकूण ठेवी रु. ८७३, आणि २६ जानेवारी २०२४ अखेर रु. ३,७१० कोटी.

  • कर्ज वाटप : १९१६-१७ मध्ये रु. ९.३० लाख आणि २६ जानेवारी २०२४ अखेर रु. २,१०६ कोटी.

  • नफा: बँकेचा १९१६-१७ मध्ये, नफा रु.९६ आणि २६ जानेवारी २०२४ अखेर , रु. ४ कोटी.

बँकेने जिल्हयाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि वरील आकडेवारी नुसार गेल्या शतकातील प्रगती दिसून येते.


सक्सेस स्टोरी

१ ) एटीएम कार्ड सेवा सुरू करण्याच्या पहिल्याच वर्षात बँकेची उत्तम कामगिरी

आमच्या जळगाव जिल्हा बँकेने दि. ०१ एप्रिल २०१७ पासून शेतकऱ्यांना रुपे केसीसी एटीएम कार्डचे वितरण सुरू केले. रुपे केसीसी एटीएम कार्डचे फायदे पटवून देण्यासाठी बँकेने शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. तसेच बँकेने बॅनर, हँडबिल, ब्रोशर इ. तयार करून सर्व शेतकऱ्यांना डिजिटल पेमेंट सिस्टमचा वापर करण्यास प्रवृत्त केले.

या सर्वांचा परिणाम म्हणजे जिल्हयामध्ये डिजिटल पेमेंट व्यवहारांमद्धे मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एटीएम कार्ड वाटपाच्या प्रथम वर्षातच दि. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत, बँकेच्या सर्व शाखांमध्ये ७ लाखांहून अधिक व्यवहारांची नोंद झाली होती.

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्याकडील दि.३० नोव्हेंबर २०१७ रोजीच्या ई-मेल द्वारे माहिती दिली की व्यवहारांच्या संख्येनुसार जळगाव जिल्हा बँक ही महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामधील सर्व जिल्हा आणि नागरी सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. बँकेने १ एप्रिल २०१७ पासून ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत ६,३२,६१७ डिजिटल व्यवहार नोंदवले होते.

तसेच नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्याकडील दुसऱ्या ईमेल द्वारे कळविले की संपूर्ण भारतातील टॉप ५० जिल्हा बँकांमध्ये स्थान मिळवणारी जळगाव जिल्हा बँक ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव सहकारी बँक आहे. सद्यस्थितीत आमचे तीन लाखांहून अधिक शेतकरी ग्राहक एटीएम कार्ड धारक असून, केवळ एटीएमवरच नव्हे तर पीओएस आणि ईकॉम द्वारे खरेदी करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर या सुविधेचा वापर करीत आहेत.


२ ) मायक्रो एटीएम सुविधा

जळगाव जिल्हा बँकेने नाबार्डच्या सहकार्याने एफ.आय.एफ. अंतर्गत प्रत्येक शाखेत एक या प्रमाणे एकुण २३८ मायक्रो एटीएम खरेदी करून कार्यान्वित केलेले आहेत.

बँकेच्या २३७ पैकी २०३ शाखा या अत्यंत ग्रामीण भागात असुन सदर मायक्रो एटीएम सुविधेमुळे आता आपल्या जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेस एटीएम सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या गावात / शहरात जाण्याची आवश्यकता नाही.

कोणत्याही बँकेचे ATM कार्ड वापरून जळगाव जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत मायक्रो एटीएम द्वारे रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.